Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on Jun 09, 2013 - 06:02:13 AM


Title - रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी चढाओढ
Posted by : ConfirmTicket on Jun 09, 2013 - 06:02:13 AM

नागपूर

नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी आता चढाओढ सुरू झाली आहे . आत्तापर्यंत या स्थानकासाठी तीन नावांचे प्रस्ताव आले आहेत . आता परत दोन नावे पुढे आली . महापौरांना यासाठी विनंती करण्यात आली . आठवड्याभरापूर्वीच नामकरणाच्या प्रस्तावावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले . हा प्रयत्न सुरू असतानाच गुरुवारी तिरळे कुणबी सेवा मंडळाने डॉ . पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला आहे .

आठवड्याभरापूर्वी मुस्लीम लीगचे मनपातील गटनेते नगरसेवक अस्लम खान यांनी मध्यवर्ती रेल्वे स्थानकाला बाबा ताजुद्दीन यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मनपाकडे दिला होता . त्यावर आक्षेप व सूचनांसाठी मनपाचे विकासयंत्री राहुल वारके यांनी अधिसूचना काढली . या नावाला अनेकांनी विरोध केला . अजनी येथील स्थानकाला आधीच बाबा ताजुद्दीन यांचे नाव देण्याचे प्रस्तावित आहे . हा प्रस्ताव राज्य शासनाकडेही प्रलंबित आहे . शिवाय रेल्वे मंडळाकडेही पाठविण्यात आला . उमरेड मार्गावर असलेल्या ताजाबादमधील उर्समध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात . अजनी रेल्वे स्थानकावर ते उतरून मेडिकलमार्गे ताजबादला जातात . त्यामुळे येथील काही भाविक मंडळाने अजनी रेल्वे स्थानकाला बाबा ताजुद्दीन यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे केला . तो रितसर राज्य सरकार व रेल्वे मंडळाकडेही सो ​ पविण्यात आला . मात्र , मुस्लीम लीगने याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला . त्याला काही नगरसेवकांनीही विरोध दर्शवित आक्षेप नोंदविला आहे . या प्रस्तावाची चर्चा थांबते न थांबते तोच देशाचे पहिले कृषीमंत्री व शिक्षणमहर्षी डॉ . पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तिरळे कुणबी सेवा मंडळाने दिला आहे . भारतीय राज्यघटना तयार करताना डॉ . बाबासाहेब यांच्या घटना समितीचे ते तज्ज्ञ सदस्य असल्याची आठवण करून देत त्यांच्या सेवेचे वर्णन केले आहे . नागपूर विमानतळाला भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्याने आनंद झाल्याचा स्पष्ट करीत मंडळाने शहराच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वे स्टेशनला डॉ . पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख नागपूर रेल्वे स्टेशन असे नाव देण्याची मागणी मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत व सचिव रमेश चोपडे यांनी पुढे केली आहे .

दरम्यान , नागपूर रेल्वे स्थानकाला ' दीक्षाभूमी ' नागपूर रेल्वे स्थानक असे नाव देण्याचेही मधल्या काळात प्रस्ताव पुढे करण्यात आला होता . काही संस्थांनी यासाठी प्रयत्नही केले . याबाबत तत्कालीन मध्य रेले मंडळाचे विभागीय व्यवस्थापकालाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते .

कोण करणार नामकरण ?

रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याचे अधिकार नागपूर मनपाला आहे का , हा खरा प्रश्न आहे . शहरातील अनेक संस्था महापौर यांना यासंदर्भात निवेदन देत आहेत . यावर मनपाचे विकासयंत्री आक्षेप व सूचना मागविण्यासाठी माध्यमात अधिसूचनाही काढत आहे . हे नियमबाह्य असल्याचे बोलले जाते . नावाच्या प्रस्तावासाठी रितसर मध्य रेल्वे मंडळाच्या विभागीय व्यवस्थापकामार्फत रेल्वे बोर्डाकडे जाणे अपेक्षित आहे . नागपुरात मात्र नामकरणावरच राजकारण सुरू झाले आहे .